
सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका. हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी `ईश्वर' नव्हे, तर `निर्मिक' असाच शब्द नेहमी वापरला. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.
भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी शेतकर्यांचा आसूड या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्यांच्या वेषात शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.
महात्मा फुले यांनी असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.
आज शिक्षक दिन ...आपणास हार्दिक शिवेच्छा...