१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Friday, January 9, 2009

जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
औरंगाबाद, ता. ९ - सिंदखेडराजा येथे सोमवारी (ता.१२) जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवधर्म स्वीकारण्यासाठी शिवभक्त येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी सांगितली. या महोत्सवाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या बाबा पेट्रोल पंप येथील राजर्षी शाहू भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दादाराव कुबेर, मदन पिसे उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले,"" सिंदखेडराजा येथे गेल्या १५ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. राजवाड्यासमोर हा कार्यक्रम होत असे, पण त्या ठिकाणची जागा अपुरी पडत असल्याने मराठा सेवा संघाने दीडशे एकरात "जिजाऊ सृष्टी' निर्माण करण्याचा महत्त्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. मोती तलावाच्या शेजारी या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. अकरा हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी दहा हजार श्रोते बसतील, असा मंडप तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अतिथीगृहही उभारणीचे काम सुरू आहे. हा प्रबोधनात्मक कार्यक्रम असून त्या ठिकाणी सर्व समाजाच्या नागरिकांना प्रवेश आहे. ते येऊन शिवधर्म स्वीकारू शकतात. या निमित्ताने शिवधर्म पद्धतीने शंभर दांपत्यांचे सामूहिक विवाह तिथे लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम औरंगाबाद येथील डॉ. दिलीप देशमुख पाहात आहेत. या वेळी पुरुषोत्तम खेडेकर, नेताजीराव गोरे, अनंत चोंदे, जयश्री शेळके, प्रवीण गायकवाड, मा. म. देशमुख हे उपस्थितांचे प्रबोधन करणार आहेत, तर सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.''
भाविकांसाठी प्रवेशद्वाराचे आकर्षण
जिजाऊ सृष्टीच्या भव्य प्रवेशद्वाराचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. हे प्रवेशद्वार दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या धरतीवर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी असणारा राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा हे भाविकांसाठीचे खास आकर्षण असणार आहे, असे श्री. जाधव यांनी सांगितले.






No comments: