नागपूर, ता. १२ - "जन्मस्थळी राष्ट्रमाता जिजाऊ कुलूपबंद' या मथळ्याखाली "सकाळ'ने जिजाऊ जन्मस्थळावर प्रकाशझोत टाकला. जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसंगी स्वखर्चातून जिजाऊंच्या स्मारकासाठी प्रयत्न करण्याची तयारी काहींनी दाखविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणी विकासकामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिजाऊ जन्मस्थळाकडे शासनाचे गंभीर दुर्लक्ष झाल्याची बाब "सकाळ'ने ठळकपणे समोर आणली. याबद्दल धन्यवाद देतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्दी येथील प्रवीण पाटील म्हणतात, ""राष्ट्रमाता जिजाऊंसाठी शासनाजवळ पैशाची कमतरता पडत असेल तर आम्ही आमच्या कमाईतून प्रत्येकी शंभर रुपये गोळा करून तेथील दुरवस्था दूर करू.'' बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आगामी अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व "सकाळ'ने मांडलेली वस्तुस्थिती मान्य केली. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनीही जिजाऊंचे जन्मस्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे व त्याची दुरवस्था संपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना नेते छगन मेहेत्रे यांनी सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकल्याबद्दल आभार मानून निदान आता तरी शासन लक्ष देईल काय, हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा वारसा जोपासण्यासाठी पैशाचे कारण पुढे न करता शासनाने सढळ हस्ते मदत केली पाहिजे. एकीकडे शिवरायांच्या नावाने राजकारण करीत असताना जिजाऊंच्या स्मारकासाठी निधी न देणे ही दुटप्पी भूमिका आता तरी शासनाने सोडून द्यावी, अशी रोखठोक प्रतिक्रिया बुलडाण्याचे आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त केली
Monday, January 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment