१२ जानेवारी २०१२ ,प्रतिनिधी , बुलढाणा यंदाही येथील जिजाऊ सृष्टी प्रकल्पावर मराठा सेवा संघाच्यावतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्याची सांगता मॉं साहेबाच्या ४१४ व्या जन्मोत्सव सोहळ्याने मोठय़ा थाटामाटात होणार आहे. यासाठी मातृतीर्थ नगरी व जिजाऊ सृष्टी नववधुप्रमाणे नटली असून जिजाऊ भक्तांचे लोंढेच्या लोंढे संपूर्ण देशासह परदेशातून मातृतीर्थावर दाखल होत आहेत. ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू झाला होता. यानिमित्ताने सृष्टीवरील कार्यक्रमाची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असून जिजाऊ भक्त मराठा सेवा संघाच्या सर्वच्या सर्व ३१ कक्षाचे श्रेष्ठ-ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यासाठी जिजाऊ सृष्टीच्या सुमारे १०० एकराच्या प्रदीर्घ मैदानावर भव्य सभामंडप, स्वागतकक्ष, रोशणाई, स्वागत कमानी, नियंत्रण कक्ष, देणगी कक्ष, स्टॉल नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, खान-पान व पुस्तकांचे स्टॉल आदी व्यवस्था सज्ज करण्यात आल्या आहेत. जिजाऊ सृष्टी परिसराला व जिजाऊ नगरीला या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले असून जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ, राजवाडा रंगमहल यासह संपूर्ण सृष्टीवर भव्य प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पॅरामोटारमधून पुष्पवृष्टी दरवर्षीप्रमाणे यंदाही सृष्टीवर व जिजाऊ भक्तांवर पॅरामोटारमधून पायलट भगवानराव जाधव पुष्पवृष्टी करणार आहेत. १२ जानेवारीला सकाळी ६ वाजता राजवाडय़ातील जिजाऊ जन्मस्थळावर विविध मान्यवर जोडप्यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन, त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान जिजाऊ सृष्टीवर विविध वैचारिक, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ते ज्येष्ठ विचारवंत मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ आधारवड डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते उत्तररात्रीपर्यंत शिवधर्मपीठावर सेवा संघाच्या ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. जिजाऊ पुरस्कार यावेळी याच विचारपीठांवर ‘वीर शिवाजी’ कलर चॅनल्सवरील लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या शिवमती रूपाली अभिमन्युसिंह यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. आ.ह. साळुखे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर, नेताजीराव गोरे, देवानंद कापसे, चंद्रशेखर शिखरेंसह सेवा संघाच्या ३१ कक्षाचे राज्याध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, डॉ. अरविंद गावंडे, शिवाजीराजे जाधव, चंद्रशेखर शिखरे, सुभाषराव कोल्हे, तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र अढाव, अण्णासाहेब बुरकुल, समाधान शिंदे, कृष्णा कुहिरे, गिरीश वाघमारे, संजय विखे, किशोर खेडेकर, संजय उनगे, राममूर्ती वालसिंगे, उमेश इंगळे, शिवाजी गव्हाड, दाळु पाटील आदी जिजाऊ भक्त परिश्रम घेत आहेत. आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज !!! सिंदखेडराजा, ११ जानेवारी/ वार्ताहर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे. उद्या १२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’ नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार, पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. |